उरुळी कांचनमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन; केरळचे पारंपरिक चेंडा वाद्य, ढोल-ताशांचा गजर अन् २५ डीजेंच्या दणदणाटात आश्रम रोडवर हजारो भक्तांची गर्दी
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन : सालाबादप्रमाणे यंदाही उरुळी कांचन (ता. हवेली) येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आश्रम रोड परिसरात गणरायाचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात आगमन करण्यात आले. केरळचे पारंपरिक चेंडा मेलम वाद्य, ढोल-ताशांचा गजर, आकर्षक विद्युत रोषणाई आणि तब्बल २५ डीजेंच्या तालावर हजारो गणेशभक्तांनी नाचत-गाजत गणरायाचे स्वागत केले.
आश्रम रोड परिसरात सायंकाळी ६ वाजता सुरू झालेली गणेश आगमन मिरवणूक रात्री साडेदहा वाजेपर्यंत उत्साहात सुरू होती. विविध गणेश मंडळांनी आकर्षक सजावट, पारंपरिक वाद्ये आणि ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला वाजतगाजत मंडपात आणले. मिरवणुकी दरम्यान संपूर्ण आश्रम रोड परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून गेला होता.
या मिरवणुकीत महात्मा गांधी तरुण मित्र मंडळ, अखिल पिराचा मळा मित्र मंडळ, पीएमडी कॉलेज मणिभाई देसाई, श्रीमंत वीर मित्र मंडळ, अखिल इरिगेशन कॉलनी मित्र मंडळ, शिवशंकर मित्र मंडळ, श्री शिवछत्रपती मित्र मंडळ, नव आझाद मित्र मंडळ, जय लक्ष्मी मित्र मंडळ, विष्णू बाळा प्रतिष्ठान, श्रीकृष्ण तरुण मंडळ, जय मल्हार मित्र मंडळ, गुरुदत्त तरुण मंडळ, सोमनाथ तरुण मंडळ, अखिल तळवाडी मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, ज्ञानेश्वर मित्र मंडळ, चिंतामणी मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ, साईनाथ मित्र मंडळ, जय भवानी मित्र मंडळ, नवचैतन्य मित्र मंडळ, लंबोदर मित्र मंडळ, शिवतेज मित्र मंडळ तसेच विघ्नहर्ता तरुण मित्र मंडळ व आदी मंडळांनी सहभाग घेतला.
केरळ मधील प्रसिद्ध चेंडा मेलम वाद्याने वेधले लक्ष..
साईनाथ मित्र मंडळाच्या वतीने डीजेच्या आवाजाच्या गर्दीतही केरळचे पारंपरिक चेंडा मेलम वाद्य वाजवून कलाविष्कार सादर करण्यात आला. पारंपरिक वाद्याच्या तालावर उपस्थित नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला. या वेगळ्या वाद्य सादरीकरणामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली.
तसेच अखिल पांढरस्थळ मित्र मंडळाच्या वतीने महिलांनी पारंपरिक ढोल-ताशा सादर केला. महिलांच्या ढोल-ताशा पथकाने दमदार वादन करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांच्या तालावर तरुणाईसह नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
आश्रम रोडवर विविध मंडळांच्या मिरवणुकीदरम्यान २५ डीजेंचा आवाज आणि आकर्षक लाईट शो यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रंगीबेरंगी विद्युत रोषणाईच्या प्रकाशात हजारो भक्तांनी नाचत-गाजत गणरायाचे स्वागत केले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. दरवर्षी आजूबाजूच्या गावातील व वाड्या वस्तीतील हजारो नागरिक जल्लोष चा आनंद घेत मिरवणूक पाहण्यासाठी येतात.
गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होणार असल्याने उरुळी कांचन पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस उपनिरीक्षक, ३० पोलीस कर्मचारी आणि २५ होमगार्ड यांनी मिरवणुकीच्या मार्गावर बंदोबस्त ठेवला.
पोलिसांच्या नियोजनामुळे मिरवणूक शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. गणेशभक्त, मंडळांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत गणरायाचे जल्लोषात स्वागत केले.

























