अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी
अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक पटकावले
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील तळवाडी परिसरात शनिवारी (ता. ५) सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सव २०२६ मध्ये राहू येथील मोरया प्रतिष्ठान गोविंदा संघाने दहीहंडी फोडत विजेतेपद पटकावले. दहीहंडी फोडणाऱ्या मोरया प्रतिष्ठान संघाला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.
दहीहंडी महोत्सवाच्या निमित्ताने तळवाडी परिसरात मोठी गर्दी झाली होती. ढोल-ताशांचा गजर, गोविंदा पथकांचा उत्साह आणि ‘गोविंदा आला रे’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विविध गोविंदा संघांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. अखेर राहू येथील मोरया प्रतिष्ठान संघाने दहीहंडी फोडत उपस्थितांची दाद मिळवली.
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे आधारस्तंभ व उरुळी कांचन गावचे माजी सरपंच सुनील (बापू) कांचन, मंडळाचे अध्यक्ष अनिल दत्तात्रय कांचन, तसेच भरत काळे, जयेश कांचन, आप्पा रानवडे, अक्षय (बंटी) कांचन, अभि रावडे आणि सुनील प्रजापती यांच्यासह अखिल तळवाडी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांचे मोठे योगदान राहिले.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
महोत्सवाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती लावली. यामध्ये जितेंद्र बडेकर (सभापती समाज कल्याण, पुणे), युवराज काकडे (पंचायत समिती सभापती, हवेली), संतोष आबासाहेब कांचन (संचालक, यशवंत सहकारी साखर कारखाना तथा माजी नियोजन समिती सदस्य), राजेंद्र (बापू) कांचन, मनीभाई पतसंस्था संस्थापक अध्यक्ष , व माजी सरपंच दत्तात्रय कांचन, संतोष हरिभाऊ कांचन, भाऊसाहेब कांचन, अजिंक्य महादेव कांचन (युवा नेते), अलंकार कांचन,सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती तसेच आदी मान्यवर पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या मोरया प्रतिष्ठान गोविंदा संघाचा सत्कार करण्यात आला. पारितोषिक प्रदान करताना उपस्थित मान्यवरांनी गोविंदा पथकाचे अभिनंदन केले तसेच आयोजक मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
दहीहंडी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि सुरक्षित वातावरणात पार पडला.
अखिल तळवाडी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे परिसरातील नागरिक, युवक आणि गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
























