सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल
उरुळी कांचन प्रतिनिधी : सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील माध्यमिक विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी अयोग्य वर्तन केल्याच्या आरोपावरून एका शिक्षकाविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकासवर्धन बाबुराव वाघमारे (रा. नायगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. या प्रकरणामुळे शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या मैदानावर तसेच स्टाफरूममध्ये बुधवार ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी आणि मंगळवार (ता.१३ ऑक्टोबर) रोजी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी संबंधित घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
संबंधित शिक्षकाने शाळेतील विद्यार्थिनीच्या कमरेवर, पाठीवर, गालावर व हातावर हात फिरवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पॉक्सो) कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यात संबंधित शिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब मत्रे करीत आहेत.























