सुपे घाटात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण
✍️ नितीन करडे
सुपे : सुपे घाटातील चढावर शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. या घटनेमुळे बसमधील विद्यार्थ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही विद्यार्थी घाबरून रडत असल्याचे समोर आले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सीएनजी बस घाटातील चढ चढत असताना बसला अपेक्षित ताकद मिळाली नसल्याने ती पाठीमागे सरकली आणि त्यानंतर पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, बस नेमकी कोणत्या कारणामुळे पाठीमागे सरकली, याबाबत अधिकृत तपासणीनंतरच स्पष्टता होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेत बसमधील विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
दरम्यान, काही विद्यार्थ्यांना रुग्णवाहिकेतून चौफुला येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही मोठी चिंता निर्माण झाली. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत केल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत बाहेर काढता आले.
बसच्या तांत्रिक स्थितीवर पालकांकडून प्रश्न या घटनेनंतर शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घाटातील चढावर बस पाठीमागे सरकण्याची परिस्थिती का निर्माण झाली? बसची तांत्रिक तपासणी करण्यात आली होती का? बसची ब्रेक, इंजिन तसेच इतर यांत्रिक यंत्रणा सुस्थितीत होती का, याबाबत पालकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित बसची तातडीने तांत्रिक तपासणी करून घटनेमागील नेमके कारण स्पष्ट करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे. या घटनेचा पोलीस तसेच संबंधित विभागाकडून तपास सुरू असून, तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

























