उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मिलिंद जगताप यांची निवड; निवडणूक दरम्यान दोन गटात बाचाबाची
उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी शुक्रवारी (ता. १९) पार पडलेल्या निवडणुकीत मिलिंद तुळशीराम जगताप यांची ९ विरुद्ध ६ मतांनी सरपंचपदी निवड झाली. या निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रियांका ओंकार कांचन यांना ६ मते मिळाली.
उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच ऋतुजा अजिंक्य कांचन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंचपद रिक्त झाले होते. त्यामुळे नियमानुसार शुक्रवारी विशेष सभा घेऊन सरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सरपंचपदासाठी मिलिंद जगताप व प्रियांका कांचन यांचे प्रत्येकी एक-एक अर्ज दाखल झाले होते. ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यांपैकी १६ सदस्य उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी यासाठी गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले. ही निवडणूक मंडल अधिकारी माधुरी बागुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असुन तलाठी प्रियंका सुंदरडे व ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे व रामलिंग भोसले यांनी कामकाज पाहिले.
मतदानाच्या निकालात मिलिंद जगताप यांना ९ मते, तर प्रियांका कांचन यांना ६ मते मिळाली. एक सदस्य गैरहजर असल्याने त्यांना मतदान करता आले नाही. बहुमत मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मिलिंद जगताप यांची सरपंचपदी अधिकृत घोषणा केली.
सरपंचपदी निवड झाल्यानंतर मिलिंद जगताप यांनी ग्रामस्थांचे व सदस्यांचे आभार मानले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीमुळे उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला असून, पुढील काळात ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. यावेळी उरळीकांचन पोलीस स्टेशनचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी उरुळी कांचन ग्रामपंचायत कर्मचारी सह नागरिक उपस्थित होते.
उरुळी कांचन ग्रामपंचायतच्या सरपंचपदाच्या निवडणुकीदरम्यान ग्रामपंचायत इमारतीच्या परिसरात दोन गटांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. मतदान प्रक्रियेवेळी झालेल्या वादामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून उरुळी कांचन पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गटांना शांत केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनुचित प्रकार टळला असून, निवडणूक प्रक्रिया नंतर शांततेत पार पडली. ग्रामपंचायत परिसरात काही काळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.





















