मिरवडीच्या शेतकरी कुटुंबातील अल्फिया शेखची पोलीस खात्यात दमदार एन्ट्री; गावाचा अभिमान उंचावला
✍️ नितीन करडे |
उरुळी कांचन प्रतिनिधी : दौंड तालुक्यातील मिरवडी गावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील सुकन्या अल्फिया अजिस शेख हिने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पुणे शहर पोलीस दलात निवड मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण मिरवडी गावात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांकडून अभिमान व्यक्त केला जात आहे.
अल्पसंसाधनांमध्ये वाढलेल्या अल्फियाने शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करत अनेक अडचणींवर मात केली. कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने हे यश मिळवले असून, तिच्या या प्रवासाने ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
अल्फियाच्या यशाचे औचित्य साधून गावातील नागरिकांच्या वतीने तिचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, अशाच प्रकारे गावाचे आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल करत राहण्याचा विश्वास व्यक्त केला.
स्वतःच्या यशाबद्दल बोलताना अल्फियाने सांगितले की, “आई-वडिल व कुटुंबाने घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवून मी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे आशीर्वाद आणि माझ्या मेहनतीमुळेच हे शक्य झाले.”अल्फियाच्या या यशामुळे मिरवडीसह परिसरातील तरुण-तरुणींना नवी दिशा मिळाली असून, ‘मेहनत केल्यास यश निश्चित मिळते’ हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
यावेळी दौंड पंचायत समिती सभापती सुखदेव चोरमले, जिल्हा परिषद सदस्य सागर (आबा) शेलार, कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड उपसभापती शरद कोळपे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बाळासाहेब शिंदे, मिरवडी गावचे सरपंच प्रवीण कांबळे, माजी सरपंच शांताराम थोरात, मिरवडी सोसायटीचे चेअरमन रजिस शेख, जालिंदर शेंडगे, विजय थोरात, राजेंद्र थोरात, विलास गजरे, तुकाराम शेंडगे, राजेंद्र टकले, बाळासाहेब मदने, गुलाब टकले, रमेश कांबळे तसेच आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

























