उरुळी कांचन तलाठी कार्यालयात नागरिकांची प्रचंड हेळसांड; सातबारा दुरुस्ती प्रकरणात कर्मचाऱ्याची अरेरावी? उरुळी कांचन तलाठी कार्यालय पुन्हा एकादा चर्चेत आले आहे.
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन (ता. हवेली)— सातबारा (7/12) फेरफारातील नावांच्या दुरुस्तींसाठी उरुळी कांचन तलाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप आणि धावपळ सहन करावी लागत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. चुकीच्या नोंदींमुळे आधीच अडचणीत असलेल्या नागरिकांना, दुरुस्ती करून मिळवण्यासाठी ‘एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर’ चकरा माराव्या लागत असून काम न होताच नागरिकांना परत पाठवले जात असल्याचे सोमवार (ता. 9 डिसेंबर ) रोजी उघडकीस आले असुन उरुळी कांचन तलाठी कार्यालय पुन्हा चर्चेत आले आहे.
सातबारा दुरुस्तींसाठी नागरिकांची वारंवार पळापळ
दुरुस्ती प्रक्रियेसाठी आलेल्या नागरिकांना “दोन दिवसांनी या”, “चार दिवसांनी या”, “त्या टेबलवर जा”, “हे काम इथे होत नाही, तिकडे जा” अशी उत्तरे देत काम लांबवले जात असल्याचे समोर आले आहे. अनेक फेऱ्या मारूनही काम न झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
ओळखपत्र विचारताच कर्मचाऱ्यांची अरेरावी
एका घटनेत तक्रारदार विजय तलरेजा यांनी संबंधित टेबलवरील कर्मचाऱ्याला ओळखपत्राविषयी विचारले असता, त्या कर्मचाऱ्याने (रामलिंग भोसले) उर्मट भाषेत “तू कोण ओळखपत्र विचारणारा?” असे म्हणत अरेरावी केली. शासनाचे कर्मचारी असूनही नागरिकांशी अशा प्रकारचे वर्तन कसे चालते, असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.
तलाठींना चौकशीअंती विचारले असता त्यांनी संबंधित व्यक्ती “शासकीय कर्मचारीच आहेत” असे स्पष्ट केले. मात्र शासकीय कर्मचारी असूनही ओळखपत्र न दाखवणे आणि नागरिकांना एकेरी भाषेत बोलणे याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता दिलेली नाही.
माझे सर्व कागदपत्रे माझ्या नावाचे असून तलाठी कार्यालयाकडून नोंदवताना चुकीचे नाव नोंदवण्यात आले आहे. “तलाठी कार्यालयाच्या चुकीमुळे माझे बँकेचे कर्ज काढण्याचे काम अडले आहे. पंधरा दिवसांपासून मी तलाठी ऑफिसच्या चकरा मारत आहे. दरवेळी मला एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फिरवले जाते. कर्मचाऱ्यांनी माझ्याशी अरेरावी केली. हा कारभार नागरिकांना त्रास देण्यासाठीच आहे का?”
: विजय तलरेजा, तक्रारदार
जबाबदारी कोणाची? नागरिकांचा प्रश्न अनुत्तरित
दुरुस्त्या न होणे, पोच न देणे, कर्मचाऱ्यांची अरेरावी, टेबलवरून टेबलवर फिरवणे, शासकीय ओळखपत्र दाखवण्यास नकार, या सर्व प्रकारांमुळे उरुळी कांचन तलाठी कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांनी शासनाकडे याबाबत तात्काळ चौकशी करून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. “नागरिकांना अपमानित करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर खरंच कारवाई होणार का?” याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.























