पुणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी ; २५० किलो गांजासह दोन आरोपी जेरबंद; १ कोटी ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त!
कुंजीर लॉन्स परिसरातून सुरू झालेला पाठलाग थेट शिरूरमध्ये थांबला; महिंद्रा XUV 700 मधून गांजाची वाहतूक उघड!
✍️ नितीन करडे
पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजा तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल २५० किलो गांजासह दोन आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईत गांजा, महिंद्रा XUV 700 कार आणि मोबाईल फोन असा एकूण १ कोटी ५१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने हे आपल्या पथकासह लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी कुंजीर लॉन्स परिसरात पांढऱ्या रंगाची महिंद्रा XUV 700 कार भरधाव वेगाने जाताना पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी हाताने इशारा करून वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने वाहन न थांबवता सोलापूरच्या दिशेने वेगाने पळ काढला.
वाहनाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी पथकासह वाहनाचा पाठलाग सुरू केला. हा पाठलाग यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचल्यानंतर स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली. दरम्यान, संशयित वाहन शिरूरच्या दिशेने गेल्याने पुणे ग्रामीण नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. त्यानंतर शिरूर पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी शहरात वाहनाचा पाठलाग करून ते ताब्यात घेतले.
यावेळी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेल्या दोन संशयितांचा पोलिसांनी शोध घेतला. अखेर शिरूर येथील स्टेट बँक कॉलनी, दत्त मंदिराजवळील सत्यभामा निवास इमारतीसमोरील मोकळ्या जागेतून दोघांना ताब्यात घेण्यात आले. समीर पुरुषोत्तम राऊत (वय २४, रा. सांगोल, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) आणि अजय जगदीश मोहिते (वय ३०, रा. बागापूर, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी संशयित महिंद्रा XUV 700 कारची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल २५० किलो गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी गांजा, वाहन आणि मोबाईल फोन असा एकूण १ कोटी ५१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण, नितीनकुमार नाईक तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-२ मधील पोलीस अंमलदार योगेश कुंभार, शरद धांडे, सतीश चव्हाण, प्रशांत कळसकर, योगेश मांढरे, सुहास धायगुडे, अख्तर शेख, अजिंक्य जोजारे, दिनेश बास्टेवाड, महिला पोलीस हवालदार सुरेखा साबळे, जान्हवी सूर्यवंशी, सुकेशिनी आंबले यांच्यासह यवत आणि शिरूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
पुणे शहर गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे गांजा तस्करीविरोधातील पोलिसांच्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून, या तस्करीमागील अन्य व्यक्ती आणि नेटवर्कचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.
























