कोरेगाव मुळमध्ये बुलेटचे ‘फटाके’ पुन्हा सुरूच ; ग्रामस्थांनी पाठलाग करून तिघांना पकडले, पोलिसांच्या ताब्यात दिले; कारवाईनंतरही रात्री सव्वा अकराला पुन्हा ‘बार’
उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील कोरेगाव मुळ परिसरात बुलेटच्या मॉडिफाइड सायलेन्सरमधून फटाक्यांसारखे कर्णकर्कश आवाज काढण्याचा प्रकार पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दत्तवाडी–बोधे काकडे वस्ती परिसरातील नवीन रस्त्यावर बुधवारी (दि. २ सप्टेंबर) दुपारच्या सुमारास बुलेटवरून मोठमोठे ‘बार’ काढणाऱ्या तिघांना संतप्त ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले आणि मोटारसायकलींसह उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन बुलेटस्वार रस्त्यावरून जात असताना त्यांच्या मोटारसायकलींमधून फटाक्यांसारखे मोठे आवाज काढत होते. हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच सात ते आठ नागरिकांनी तातडीने त्यांचा पाठलाग केला. अखेर तिघांना मोटारसायकलींसह पकडून पोलिसांना माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले, पोलीस शिपाई अमोल खांडेकर, अश्वजीत मोहोड तसेच वॉर्डन करे यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित बुलेट मोटारसायकली ताब्यात घेऊन कारवाई केली.
धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणातील तिघेही उरुळी कांचन येथील एका विद्यालयातील अकरावी-बारावीतील अल्पवयीन विद्यार्थी असुन ते शाळेच्या गणवेशात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच हे विद्यार्थी बोरी येथील असल्याची माहिती समोर आली.
कारवाई झाली… पण ‘बार’ पुन्हा सुरू!
पोलिसांकडून बुधवारी सायंकाळी कारवाई करण्यात आल्यानंतरही रात्री सव्वा अकराच्या सुमारास पेठ रोडवरून पुन्हा बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाचे ‘बार’ काढण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर गुरुवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या दरम्यान कोरेगाव मुळ रस्त्यावरून पुन्हा बुलेटस्वारांनी फटाक्यांसारखे आवाज काढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांची कारवाई नेमकी किती प्रभावी? असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
वयोवृद्ध, लहान मुलांना त्रास; नागरिक संतप्त
कोरेगाव मुळ परिसरात काही बुलेट मोटारसायकलींवरून वारंवार मोठे आवाज काढले जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत हा प्रकार सुरू राहत असल्याने परिसरातील शांतता भंग होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मॉडिफाइड सायलेन्सर लावून फटाक्यांसारखे आवाज काढणाऱ्या वाहनचालकांवर कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
“आमच्या घरातील वयोवृद्ध व्यक्तीच्या हृदयाचे ऑपरेशन झाले आहे. अचानक होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच मोठ्या आवाजाने लहान मुले दचकतात. नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या अशा मोटारसायकलींवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी,”
– दत्तात्रेय काकडे, ग्रा. सदस्य, कोरेगाव मुळ
“बुधवारी सायंकाळी पोलिसांकडून कारवाई झाली. मात्र कारवाईनंतरही रात्री सव्वा अकराच्या सुमारास पेठ रोडवर पुन्हा बुलेटचे ‘बार’ काढण्यात आले. गुरुवारी सकाळी ११ वाजताही कोरेगाव मुळ रस्त्यावर पुन्हा असाच प्रकार झाला,”
– सचिन कड, स्थानिक नागरिक, कोरेगाव मुळ























