उरुळी कांचनमध्ये महामार्गावर भीषण अपघात! रिक्षातून उतरताना प्रवासी थेट टेम्पोच्या चाकाखाली; जागीच मृत्यू ; मृताची ओळख पटवण्याचे आवाहन
प्रवासी वाहतुकीच्या नियमांना हरताळ? रिक्षा भर महामार्गात थांबली; उजव्या बाजूने प्रवासी उतरविण्याचा धोकादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद
उरुळी कांचन | प्रतिनिधी, नितीन करडे
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील तळवाडी चौकात पुणे-सोलापूर महामार्गावर मंगळवारी (दि. १ सप्टेंबर) सायंकाळी सुमारे ६ वाजून २० मिनिटांच्या सुमारास अत्यंत धक्कादायक अपघात घडला. हडपसरच्या दिशेने आलेल्या रिक्षातून प्रवासी उतरत असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो थेट महामार्गावर पडला. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ४०७ टेम्पोच्या चाकाखाली तो गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, या घटनेमुळे उरुळी कांचन परिसरातील बेकायदा व धोकादायक प्रवासी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अज्ञात व्यक्ती हडपसरच्या बाजूने तीन चाकी रिक्षातून उरुळी कांचन येथे आला होता. रिक्षा तळवाडी चौक परिसरात थांबल्यानंतर तो खाली उतरत असताना अचानक त्याचा तोल गेला. तो महामार्गावर पडताच पाठीमागून येणाऱ्या ४०७ टेम्पोच्या चाकाखाली आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यामध्ये रिक्षा भर महामार्गावर थांबलेली असल्याचे दिसत असल्याची माहिती आहे. तसेच प्रवासी रिक्षाच्या उजव्या बाजूने खाली उतरत असल्याचेही दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रवासी उतरविण्यासाठी वाहन रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे न घेता महामार्गावरच थांबविले जात असेल, तर अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे आणखी किती निष्पाप नागरिकांचे बळी जाणार? हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
पुणे सोलापूर महामार्गावर पैसेंजर वाहतूक की मृत्यूचा सापळा?
पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन परिसरात मोठ्या प्रमाणात रिक्षा, पॅगो, मॅक्झिमा आणि इतर प्रवासी वाहनांतून वाहतूक केली जाते. अनेक वेळा प्रवासी वाहनाच्या उजव्या बाजूने उतरविले जातात. मात्र महामार्गावरून भरधाव वाहने ये-जा करत असताना अशा पद्धतीने प्रवासी उतरविणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
या अपघातातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे संबंधित ४०७ टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार टेम्पोमध्ये अंदाजे १५ ते २० प्रवासी असल्याचे दिसत आहे. जर ही बाब तपासात खरी ठरली, तर प्रवासी वाहतुकीचे नियम, वाहनाची क्षमता, परवाना आणि सुरक्षिततेच्या निकषांचे पालन होत आहे का? याची प्रशासनाने गांभीर्याने चौकशी करण्याची गरज आहे.
“पुणे सोलापूर महामार्गावर अवैध प्रवासी वाहतूक?”
पुणे सोलापूर महामार्गावरील हडपसर, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन तसेच यवत परिसरापर्यंत प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. मात्र प्रवाशांना कुठे उतरवले जाते, वाहन कुठे थांबवले जाते, प्रवाशांची संख्या किती आहे आणि वाहनचालक नियमांचे पालन करतात का, यावर नियमितपणे कारवाई होते का नाही? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे.
एकीकडे महामार्गावर वेगाने वाहतूक सुरू असताना दुसरीकडे रस्त्यावरच प्रवासी उतरवले जात असतील, तर हा प्रकार अपघाताला आमंत्रण देणारा नाही का? या घटनेची केवळ अपघात म्हणून नोंद न करता प्रवासी वाहतूक व्यवस्थेची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
“प्रशासन आता जागे होणार का?”
या दुर्घटनेनंतर केवळ मृत व्यक्तीची ओळख पटवून प्रकरण संपविण्याऐवजी महामार्गावरील प्रवासी वाहनांची थांबण्याची पद्धत, उजव्या बाजूने प्रवासी उतरविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक आणि बेकायदा प्रवासी वाहतूक यावर कठोर कारवाई होणार का? हा खरा प्रश्न आहे.
आज एका प्रवाशाचा जीव गेला आहे; उद्या पुणे सोलापूर महामार्गावर आणखी किती जीव जाण्याची वाट प्रशासन पाहणार? उरुळी कांचनमधील नागरिक आता या प्रश्नावर ठोस आणि कायमस्वरूपी कारवाईची मागणी करत आहेत.
“मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन”
अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. सदर इसम कोणाच्या ओळखीचा असल्यास किंवा त्याच्याबाबत कोणाला माहिती असल्यास तातडीने उरुळी कांचन पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक –
बापूसाहेब मञे, मोबाईल 9552576117
उरुळी कांचन पोलीस स्टेशन – 020-26926287
























