आरोग्याचा जागर अन् सामाजिक उपक्रमांचे आयोजन; सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचनमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर!
उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तसेच श्री काळभैरवनाथ सेवा समितीचे विश्वस्त सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी विविध आरोग्यविषयक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार,( दि. ८ सप्टेंबर) रोजी सकाळी ९.३० वाजता बायफ रोड येथील तांबे वस्ती येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार असून विविध आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन व वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे. शिबिरात बीपी, शुगर, बीएमआय, हिमोग्लोबिन, रक्तदाब यांसह विविध आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत. तसेच बालरोग व स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय नागरिकांसाठी रक्तदान शिबिर, मोफत चष्मे वाटप, अँजिओग्राफीसाठी मार्गदर्शन, महा-ई-सेवा/महा आयडी कार्ड नोंदणी आदी उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.
“बांधकाम कामगारांसाठी विशेष नोंदणी”
विश्व निर्भय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र बांधकाम कामगारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“ज्येष्ठ नागरिकांसाठीही विविध सुविधा”
शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, नवीन एसटी बस एनसीएमसी स्मार्ट कार्ड यांसाठी नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत आरोग्य विम्यासाठी आयुष्मान कार्ड तयार करून देण्याची सुविधाही उपलब्ध असणार आहे.
या विविध उपक्रमांमुळे उरुळी कांचन व परिसरातील गरजू, गोरगरीब कुटुंबे, ज्येष्ठ नागरिक, महिला, बालक तसेच बांधकाम कामगारांना मोठा फायदा होणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास परिसरातील अनेक मान्यवर, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोफत आरोग्य तपासणी तसेच विविध शासकीय व सामाजिक उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
“वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता गरजू नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि सामाजिक हितासाठी उपयोगी ठरावा,” या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे सुनील आबा तांबे यांनी सांगितले.
























