उरुळी कांचन परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ! बॅटरी चोरी, घरफोडी, दुचाकी चोरीनंतर आता चारचाकी वाहनांवर डोळा!
आश्रम रोडवर मध्यरात्री स्कॉर्पिओ चोरीचा प्रयत्न; वायरी, दरवाजाचे लॉक आणि चावीचे लॉक तोडले; वाहनमालकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला!
✍️ नितीन करडे
Uruli Kanchan – news उरुळी कांचन : (ता. हवेली) शहरासह परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, वाहनांच्या बॅटऱ्या चोरी, बंद घरांमध्ये घरफोडी, मोटारसायकल चोरी अशा घटनांनंतर आता चोरट्यांनी थेट चारचाकी वाहनांकडे मोर्चा वळविल्याचे समोर आले आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी घराबाहेर उभी असलेली वाहने आणि बंद घरे कितपत सुरक्षित आहेत, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील आश्रम रोड परिसरात चोरट्यांनी नवीन स्कॉर्पिओ चारचाकी वाहन चोरण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी वाहनाच्या वायरी तोडून दरवाजाचे लॉक तसेच चावीचे लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनातील हालचाली आणि आवाजामुळे वाहनमालक सतर्क झाले आणि घराबाहेर आले. त्यावेळी चोरट्यांनी वाहन चोरीचा डाव अर्धवट सोडून चारचाकीतून घटनास्थळावरून पळ काढला. वाहनमालकाच्या सतर्कतेमुळे मोठी चोरी टळली.
मात्र, या घटनेने उरुळी कांचन परिसरातील रात्रीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात एकामागून एक चोरीच्या घटना घडत असताना रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त नेमकी कुठे असते? गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या वाहनांचा चोरट्यांवर धाक राहिला आहे का? रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरटे बिनधास्तपणे चोरीचे प्रयत्न करत असतील, तर नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण कोण करणार? असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
विशेष म्हणजे, चोरीच्या घटनांचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत असून, आता चोरट्यांनी चारचाकी वाहनांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. घराबाहेर वाहने पार्क करणारे वाहनमालक तसेच रात्रीच्या वेळी बंद असलेल्या घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पोलिस प्रशासनाने केवळ चोरीनंतर तपास करण्यापुरते मर्यादित न राहता रात्रीची गस्त वाढवावी, संशयितांवर लक्ष ठेवावे, सीसीटीव्ही यंत्रणेची तपासणी करावी आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांनो, सावधान !
उरुळी कांचन शहर व परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी. आपली घरे व्यवस्थित बंद करावीत, दुचाकी व चारचाकी वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत, शक्य असल्यास सीसीटीव्ही आणि वाहन सुरक्षा यंत्रणा बसवावी. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी.
चोरट्यांचा वाढता धुमाकूळ थांबणार तरी कधी? नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन आता ठोस पावले उचलणार का? हा प्रश्न उरुळी कांचनकरांना सतावत आहे.
























