मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई
✍️ नितीन करडे
दौंड : यवत (ता. दौंड) पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असून, बोरीभडक परिसरात केलेल्या कारवाईत मोक्का व खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झालेल्या एका आरोपीकडून एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस, असा एकूण २५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजता करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीभडक फाटा ते बोरीभडक गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे ५०० मीटर अंतरावर एक इसम विनापरवाना गावठी पिस्टल बाळगत असल्याची गोपनीय माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी ऋषभ रमेश बडेकर (वय ३०, रा. बडेकर नगर उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) हा विनापरवाना व बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल जवळ बाळगताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात शस्त्रे, तलवारी, बंदुका किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू जवळ बाळगण्यास मनाई करणारा जिल्हाधिकारी, पुणे यांच्या कार्यालयाचा आदेश लागू असताना आरोपीने त्याचे उल्लंघन केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऋषभ रमेश बडेकर याच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीविरुद्ध यापूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर आरोपीच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तसेच त्याच्याकडे अवैध शस्त्र आढळण्यामागील कारणांची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार रॉकी देवकाते करीत आहेत. यवत पोलिसांकडून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, पोलीस हवालदार रॉकी देवकाते, संदीप देवकर, महेंद्र चांदणे, पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव, मारुती बाराते, अमोल भुजबळ, प्रतिक, सचिन गुंड, दिनेश लोणकर आणि विनीत कुन्हाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
























