सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल, तसेच वाहतूक नियम भंग करणाऱ्या ३२६ जणांवर कारवाई
मॉडिफाइड बुलेट सायलेन्सर व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सासवड पोलिसांचा दणक
✍️ नितीन करडे
सासवड : सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात सासवड पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान मॉडिफाइड सायलेन्सर बसवून मोठ्या आवाजात वाहने चालविणाऱ्या बुलेटस्वारांसह विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
या विशेष मोहिमेत मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या एकूण ४७ बुलेट मोटारसायकलींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत संबंधित वाहनचालकांकडून ४ लाख ७० हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. मॉडिफाइड सायलेन्सरमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होत असून, नागरिकांना त्रास होण्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली.
” मॉडिफाइड बुलेट सायलेन्सर व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सासवड पोलिसांचा दणका “
तसेच ट्रिपल सीट, विना हेल्मेट तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्धही पोलिसांनी कठोर भूमिका घेतली. अशा प्रकारच्या उल्लंघनांप्रकरणी एकूण ३२६ केसेस करण्यात आल्या असून, त्यामध्ये २ लाख ७४ हजार ६०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे. दरम्यान, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या १६ वाहनचालकांविरुद्धही प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.
वाहनांमध्ये अनधिकृत बदल करून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसविणे, हेल्मेट न वापरणे, ट्रिपल सीट प्रवास करणे तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणे यामुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा आणि वाहनांमध्ये अनधिकृत बदल करून ध्वनीप्रदूषण करू नये, असे आवाहन सासवड पोलिसांकडून करण्यात आले आहे.
ही कारवाई सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष शिंदे, अभिजीत कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल चव्हाण तसेच आदी पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.
[वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमाचे पालन करावे, बुलेट स्वरांनी सायलेन्सर मध्ये बदल करू नये, नियमाचे उल्लंघन करणाऱ्याची गय केली जाणार नाही.]
संतोष घोळवे- पोलिस निरीक्षक, सासवड पोलीस स्टेशन
























