बीजेएस महाविद्यालयातील मोडी कागदपत्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; १,३०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी घेतला इतिहासाचा अनोखा अनुभव
✍️ नितीन करडे
पुणे : वाघोली (ता. हवेली), प्रतिनिधी : भारतीय इतिहासाचा अमूल्य ठेवा जपणाऱ्या मोडी लिपीतील दुर्मिळ कागदपत्रांचा परिचय नव्या पिढीला व्हावा, इतिहासाविषयी अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी आणि महाराष्ट्राचा समृद्ध ऐतिहासिक वारसा समाजापर्यंत पोहोचावा या उद्देशाने भारतीय जैन संघटनेचे (बीजेएस) कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, वाघोली येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय मोडी कागदपत्र प्रदर्शनाला विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाला तब्बल १,३०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी भेट देत ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास केला.
सांस्कृतिक कार्य विभाग, पुराभिलेख संचालनालय, मुंबई (महाराष्ट्र शासन) आणि बीजेएस महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले यांच्या हस्ते झाले.यावेळी बोलताना सुजितकुमार उगले म्हणाले की, “मोडी लिपी ही भारतीय ज्ञान प्रणालीतील अत्यंत महत्त्वाची लिपी असून तिच्यातील दुर्मिळ ऐतिहासिक कागदपत्रांच्या माध्यमातून मध्ययुगीन भारताचा सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि प्रशासकीय इतिहास अधिक स्पष्टपणे समजून घेता येतो. या दस्तऐवजांचे जतन आणि अभ्यास ही काळाची गरज आहे.”तसेच महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाकडे सुमारे साडे सतरा कोटी ऐतिहासिक कागदपत्रांचा अमूल्य ठेवा सुरक्षित असून तो पुणे, मुंबई, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील विभागीय पुराभिलेख कार्यालयांमध्ये जतन करण्यात आला आहे. या कागदपत्रांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास भावी पिढ्यांसाठी जतन केला जात आहे.
कार्यक्रमाला बीजेएस प्रबंध समिती सदस्य सुरेश साळुंके, सीईओ डॉ. रविंद्रसिंह परदेशी, प्राचार्या डॉ. मनिषा बोरा, प्राचार्य संतोष भंडारी, सहाय्यक संचालक गणेश खोडके, महेश पाटील, शैला जंगम, ॲड. सतीश हरगुडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनात आज्ञापत्र, वतनपत्र, सनदपत्र, करारनामापत्र, वर्षासनपत्र, इनामपत्र, दानपत्र, सरंजामपत्र, अभयपत्र, ताकीदपत्र, दस्तकपत्र, राजीनामापत्र, मिरासी वतनपत्र, विनंतीपत्र, हकीकतपत्र, बातमीपत्र, जामीनकतबापत्र, जबाबपत्र, तहनामापत्र, यादीपत्र, निकालपत्र, निवाडापत्र, कौलनामापत्र, क्रयपत्र, आभारपत्र अशा विविध प्रकारच्या दुर्मिळ मोडी कागदपत्रांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. प्रत्येक कागदपत्राचा ऐतिहासिक संदर्भ आणि त्यामागील प्रशासकीय, सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
विविध शाळा-महाविद्यालयांचा सहभाग
या प्रदर्शनाला बीजेएस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बीजेएस वसतिगृह, माध्यमिक आश्रम शाळा (वाघोली), छत्रपती संभाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (कोरेगाव भीमा), विष्णूजी शेकोजी सातव विद्यालय, हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालय (फुलगाव), बीजेएस कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (खडकी), कै. तुकाराम धोंडीबा पठारे महाविद्यालय (चंदननगर), वाडिया कॉलेज आणि मॉडर्न कॉलेज (पुणे) यांसह अनेक शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी व शिक्षकांनी भेट दिली.
यावेळी शिक्षक विजय फापळे, शुभांगी गायकवाड, रामदास औटी, विक्रम बस्तापुरे, तानाजी हंडाळ, नारायण खुळे, डॉ. प्रकाश पांढरमिसे, प्रा. अश्विनी गायकवाड आणि गणेश सातव यांनी विद्यार्थ्यांसह प्रदर्शनाचा लाभ घेत मोडी कागदपत्रांचा अभ्यास केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनिषा बोरा यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सहदेव चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सचिन कांबळे यांनी केले.
या प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. बंडू ब्राम्हणे, प्रा. निखील आगळे, डॉ. रुपाली सोनवणे, श्याम पाटील, गिरीष शहा तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.























