गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च
प्रमुख चौक व मार्गांवर पोलिसांची प्रभावी उपस्थिती; नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच पोलिसांची दृश्यमान उपस्थिती वाढवून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने शनिवार (दि. १२ सप्टेंबर ) रोजी सायंकाळी ५.१५ ते ६.१५ वाजेपर्यंत प्रभावी रूट मार्च काढण्यात आला.
गणेशोत्सव काळात उरुळी कांचन परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ, गणेश मंडळांच्या विविध उपक्रमांमुळे होणारी गर्दी तसेच वाहतुकीची वाढती हालचाल लक्षात घेऊन पोलिसांनी हा रूट मार्च आयोजित केला. यावेळी गावातील महत्त्वाचे चौक, प्रमुख रस्ते आणि गर्दीची ठिकाणे पोलिसांच्या उपस्थितीने व्यापून गेली.
हा रूट मार्च उरुळी कांचन पोलीस स्टेशन, पीएमटी चौक, आश्रम रोड, ग्रामपंचायत चौक, सटवाई चौक, एम.जी. रोड, तळवाडी चौक, पुणे-सोलापूर महामार्ग, उरुळी कांचन पोलीस स्टेशन असा घेण्यात आला.
रूट मार्चदरम्यान पोलिसांनी परिसरातील प्रमुख चौक व संवेदनशील ठिकाणांची पाहणी केली. आगामी गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे यावेळी दिसून आले.
या रूट मार्चमध्ये १ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ४ पोलीस उपनिरीक्षक आणि १० पोलीस अंमलदार, तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक, बारामती यांच्याकडील २० स्ट्राइकिंग होमगार्ड सहभागी झाले होते. हा रूट मार्च उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
गणेशोत्सव हा उत्साहाचा आणि मोठ्या जनसहभागाचा सण असल्याने या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी, वाहतूक व्यवस्था, मिरवणुका आणि गणेश मंडळांच्या कार्यक्रमांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे या रूट मार्चमधून स्पष्ट झाले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या या दृश्यमान उपस्थितीमुळे उरुळी कांचन परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला असून, आगामी उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला.
























