१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी!
✍️ नितीन करडे
पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, पर्समधील मौल्यवान वस्तू तसेच मोबाईल चोरी करणाऱ्या टोळ्यांविरोधात विश्रामबाग पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने वेगवेगळ्या ठिकाणांहून १५ संशयित आरोपींना ताब्यात घेत जेरबंद केले असून, तब्बल २२ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गणपती विसर्जन मिरवणुकीतील चोरी करणाऱ्या टोळीवर विश्रामबाग पोलिसांचा कडक प्रहार
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध विसर्जन मिरवणुका व गर्दीच्या ठिकाणी राज्यातील तसेच परराज्यातील चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय होण्याची शक्यता लक्षात घेऊन, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घेण्याचे आदेश परिमंडळ-१ चे पोलीस उपआयुक्त कृषीकेश रावले यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांना दिले होते.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके तसेच त्यांच्या पथकाला गर्दीच्या ठिकाणी चोरी करणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.
पोलिसांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशात निगराणी ठेवली. संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवत पथकाने वेगवेगळ्या ठिकाणांहून एकूण १५ संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी गणेशोत्सवाच्या कालावधीत तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन, मंगळसूत्र, पर्समधील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन तसेच पाकिटांची चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १९ गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये सोन्याचे दागिने चोरीचे १५, मोबाईल चोरीचे ३ आणि पाकीट चोरीचा १ गुन्हा समाविष्ट आहे.
तसेच फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोन्याचे दागिने चोरीचे ३ गुन्हे, तर चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १ गुन्हा उघडकीस आला आहे. अशा प्रकारे विविध पोलीस ठाण्यांतील एकूण २२ गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला आहे.
या सर्व गुन्ह्यांमधील सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईतील आरोपी संतोष कान्हु पवार (रा. अहिल्यानगर), जालिंदर शयीराव वाघमारे (रा. गजानन नगर, बीड), सुशांत शिवाजी गायकवाड (रा. म्हाडा कॉलनी, लातूर), गफर मौला शेख वर्षे (रा. नामपल्ली, हैदराबाद) आणि शेख सैबाज शेख शफीक (रा. मालेगाव, नाशिक) यांना संबंधित गुन्ह्यांमध्ये २९ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
विश्रामबाग तपास पथकाने २५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत सलग ५६ तास अथक परिश्रम घेत ही कारवाई केली. गर्दीच्या ठिकाणी चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन विविध पोलीस ठाण्यांमधील गुन्ह्यांचा छडा लावण्यात पथकाला यश आले.
ही कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१ कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विकास भिंगारदिवे व रमेश लाहिगुडे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, सत्यवान गेंड, पोलीस उपनिरीक्षक मेहबुब मोकाशी तसेच पोलीस अंमलदार सचिन कदम, नितीन मुंढे, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, शशीकांत दरेकर, कैलास डुकरे, जाकीर मणियार, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, फिरोज इनामदार, सागर मोरे, अर्जुन थोरात, नितीन बाबर आणि रोशनी बर्डे यांनी ही कारवाई केली.
गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
























