उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर उरुळी कांचन पोलिसांनी कारवाई करत एका सराईत आरोपीला रंगेहाथ पकडले. सुधीर सुरेश बोंबरे (वय 34, रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार (ता. 24 ऑगस्ट) रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास उरुळी कांचन गावच्या हद्दीतील बाजार मैदान परिसरात आंदेकर यांच्या इमारतीच्या आडोशाला एक इसम कल्याण मटका नावाचा जुगार खेळवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली असता सुधीर बोंबरे हा आपल्या ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका जुगाराचा खेळ खेळवत असल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी जुगाराचे आकडे असलेली दोन पुस्तके, निळ्या शाईचे बॉलपेन तसेच 1,300 रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या पुस्तकांमध्ये कल्याण मटका जुगाराशी संबंधित आकडे नोंदविल्याचे पोलिसांच्या कारवाईत आढळून आले.
या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार प्रविण नारायण चौधर यांनी फिर्याद दिली आहे. विशेष म्हणजे आरोपी सुधीर बोंबरे याच्यावर यापूर्वीही जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यामुळे उरुळी कांचन परिसरात वारंवार जुगाराच्या प्रकारात सहभागी होणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांची करडी नजर असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.























