रामवाडी-वाघोली मेट्रो मार्गाबाबत आढावा बैठक; नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्याच्या आमदार कटके यांच्या सूचना
✍️ नितीन करडे
पुणे : प्रस्तावित रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गासंदर्भात मेट्रो प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आमदार माऊली आबा कटके यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. बैठकीत कटकेवाडी ते वाघोली दरम्यानच्या मेट्रो कामांचे नियोजन, निविदांची सद्यस्थिती, स्थानकांचे नामकरण, भूसंपादन, वीजपुरवठा व्यवस्था आणि भविष्यातील पायाभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.
वाघेश्वर मंदिर परिसरातील मेट्रो स्थानकाचे डिझाईन स्थानिक सांस्कृतिक वारसा जपणारे असावे तसेच वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकांना सुलभ प्रवेश मिळावा, अशा सूचना देण्यात आल्या. मेट्रो मार्गाचा विस्तार, डीपी रोड आरक्षण, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे व दाट लोकवस्तीच्या भागांचा विचार करून नियोजन करण्याची मागणीही करण्यात आली.
मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीत स्थानिक नागरिकांच्या सुविधा व भविष्यातील गरजांना प्राधान्य द्यावे, असे आमदार कटके यांनी सांगितले. तसेच रामवाडी-वाघोली मेट्रो, पुणे-शिरूर महामार्ग आणि संबंधित विभागांमधील समन्वयासाठी लवकरच उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री मा. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.






















