चंदननगर पोलिसांची तत्परता; आयटीसीच्या एमडीची हरवलेली बॅग अवघ्या २ तासांत शोधून दिली
✍️ नितीन करडे |
पुणे, दि. १५ एप्रिल, रोजी चंदननगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी दाखवलेल्या तत्परता आणि शिताफीमुळे आयटीसी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर निशांत कुमार यांची हरवलेली महत्त्वाची बॅग अवघ्या दोन तासांत शोधून काढण्यात यश आले. या कामगिरीबद्दल संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १५ एप्रिल रोजी निशांत कुमार यांची लॅपटॉप बॅग हरवली होती. या बॅगेमध्ये ॲपल कंपनीचे मॅकबुक, लॅपटॉप, स्वतःचा व कुटुंबीयांचे पासपोर्ट, बँकेची क्रेडिट व डेबिट कार्ड्स तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. त्यामुळे ही बाब अत्यंत संवेदनशील बनली होती.
घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस हवालदार रमेश मेमाणे आणि पोलीस अंमलदार सुशील बेंद्रे यांनी अत्यंत वेगाने आणि कुशलतेने तपास करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, तसेच विविध ठिकाणी चौकशी केली.
पोलीस पथकाच्या या समन्वयित आणि जलद कारवाईमुळे अवघ्या दोन तासांच्या आत संबंधित बॅग सुरक्षितपणे शोधून काढण्यात आली आणि ती निशांत कुमार यांच्या ताब्यात देण्यात आली. आपली हरवलेली बॅग इतक्या कमी वेळेत सुरक्षितपणे परत मिळाल्याने निशांत कुमार यांनी समाधान व्यक्त करत चंदननगर पोलिसांचे मनापासून आभार मानले. त्यांनी संबंधित अधिकारी व अंमलदारांचे विशेष कौतुक करत त्यांच्या कार्यतत्परतेचे अभिनंदन केले.
या घटनेमुळे चंदननगर पोलिसांची कार्यक्षमता, जबाबदारीची जाणीव आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असलेली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अशा तत्पर कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ होत असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले.























