ट्रॅक्टर अनुदानासाठी ३ हजारांची लाच मागणाऱ्या कृषी अधिकाऱ्यावर एसीबीची कारवाई
✍️ नितीन करडे |
पुणे प्रतिनिधी : ट्रॅक्टर अनुदानाचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी लाच मागणाऱ्या पंचायत समिती, पुरंदर येथील मंडळ कृषी अधिकारी अमोल सुनील सुतार (वय 31) यांच्याविरुद्ध अॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) पुणे यांनी कारवाई करत सासवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा (क्र. 109/2026) दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुतार यांनी तक्रारदाराकडून ट्रॅक्टर अनुदान मंजुरीचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी सुरुवातीला 5,000 रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने 6 ऑगस्ट 2024 रोजी महाडिबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अर्ज केला होता. संबंधित प्रस्तावाची पडताळणी करून तो पुढे पाठविण्याची जबाबदारी सुतार यांच्याकडे होती.
तक्रारदाराने 29 डिसेंबर 2025 रोजी एसीबीकडे तक्रार केल्यानंतर करण्यात आलेल्या पडताळणीत पंचांसमक्ष सुतार यांनी तडजोडीअंती 3,000 रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे यांनी सापळा रचून कारवाई केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
दरम्यान,
शासकीय कामासाठी कोणीही लाच मागितल्यास नागरिकांनी तात्काळ एसीबी पुणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.























