ट्रान्सफॉर्मेशन फोरमकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा दिमाखदार गौरव; विविध स्पर्धा परीक्षांत यश मिळवणाऱ्यांचा सत्कार
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमच्या वतीने कै. डॉ. बी. एन. देशपांडे आणि डॉ. विनोद डोंबे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेला गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम हडपसर येथील टेरेट्री रेस्टॉरंट येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमचे विश्वस्त डॉ. समीर ननावरे यांनी केले होते.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या बीएएमएस २०२५ परीक्षेत उज्ज्वल यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठात प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या डॉ. तनया काळे, डॉ. ऋतुजा भाकरे आणि डॉ. ऋषिकेश पराड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच विविध विषयांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या डॉ. ऋतुजा भाकरे (कायचिकित्सा) आणि डॉ. गजानन कुलकर्णी (शल्यतंत्र) यांचाही गौरव करण्यात आला.
याचबरोबर, संस्थेच्या मोफत मार्गदर्शन आणि शिष्यवृत्ती उपक्रमांतर्गत यूपीएससी २०२४–२५ परीक्षेत यश मिळवणारे मनोज पाटील, धनंजय दिघे, अल्पेक्ष ढवळे आणि हेमकृष्ण पिसदे यांचा सत्कार करण्यात आला. एमपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या मंगेश सुरुशे आणि चेतन वंजारी यांनाही गौरविण्यात आले. तसेच सीएपीएफ परीक्षेत यश संपादन करणारे अनुप द्विवेदी, भुवनेश काबळे आणि निखिल वसईकर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला डीआयजी प्रकाश रेड्डी, सीबीआय डीआयजी सारा शर्मा, पुणे पासपोर्ट कार्यालयाचे प्रमुख डॉ. विनोद गायकवाड, डॉ. महेश दळे, डीआयजी (नारकोटिक्स) डॉ. केतन पाटील, एसपी जयश्री देसाई आणि सोहम मांढरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिद्द, सातत्य, शिस्त आणि कौशल्य विकास यांचे महत्त्व अधोरेखित केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. विक्रम गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत यूपीएससी, एमपीएससी आणि सीएपीएफ अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये एकूण ५३ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे, ही संस्थेसाठी अभिमानास्पद बाब आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोनल भालेराव यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. कल्पेश वाणी यांनी मानले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून उपस्थितांकडून त्याचे कौतुक करण्यात आले.























