आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक
✍️ नितीन करडे
पुणे : आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देणे आणि त्यांच्या विविध अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयातील भिमाशंकर हॉल येथे आजी-माजी सैनिकांची बैठक घेण्यात आली. शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
बैठकीस पोलीस उपअधीक्षक (गृह) अविनाश शिळीमकर, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, जिल्हा सैनिक कार्यालयाचे सहायक अधिकारी हरी सूर्यवंशी, सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक विकास भुजबळ, महिला पोलीस प्रतिनिधी तथा महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाघमारे यांच्यासह सुमारे ३५ आजी-माजी सैनिक व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित आजी-माजी सैनिकांनी सायबर गुन्हे, शारीरिक गुन्हे, जमिनीचे वाद, फसवणूक यांसह विविध समस्यांची माहिती अधिकाऱ्यांसमोर मांडली. संबंधितांच्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या असून काही सभासदांनी लेखी तक्रार अर्जही सादर केले. या तक्रारींच्या चौकशी व पुढील कार्यवाहीसाठी संबंधित पोलीस ठाण्यांकडे पाठविण्यात आल्या आहेत.
सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन
पुणे जिल्ह्यातील अनेक माजी सैनिक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरत असल्याने त्याबाबत अधिक जागरूक राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सोशल मीडियाचा वाढता वापर लक्षात घेता त्याचा सुरक्षित वापर करण्याबाबत माहिती देण्यात आली. मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंक किंवा APK फाईल्स उघडू नयेत, कोणालाही OTP देऊ नये आणि कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले.
तसेच ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली होणाऱ्या सायबर फसवणुकीबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक (गृह) अविनाश शिळीमकर यांनी केले. आजी-माजी सैनिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही बैठक शांततेत पार पडली.

























