सासवड पोलिसांची दमदार कारवाई; गावठी पिस्टलसह तरुणाला अटक
✍️ नितीन करडे
सासवड : सासवड पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दमदार कारवाई करत अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेत अटक केली आहे. या कारवाईत गावठी पिस्टलसह तब्बल ७ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी चंदन टेकडीजवळ, के. के. पेढा दुकानाच्या पाठीमागे, ता. पुरंदर, जि. पुणे येथे करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम सतीश कामथे (वय २५, रा. शिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे) हा चंदन टेकडी परिसरात संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याला त्याच्या चारचाकी वाहनासह सासवड पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याच्याकडे अवैध अग्निशस्त्र असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दोन पंचांना बोलावून त्यांच्या समक्ष वाहनाची झडती घेतली. यावेळी कारच्या पुढील डॅशबोर्डखालील ड्रॉवरमध्ये एक गावठी पिस्टल आढळून आले. पोलिसांनी तत्काळ हे अग्निशस्त्र जप्त करून शुभम कामथे याला अटक केली. या प्रकरणी सासवड पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३५ हजार रुपये किमतीचे स्टीलच्या लोखंडी बॉडीचे गावठी पिस्टल तसेच ७ लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची मारुती कंपनीची फ्रॉन्क्स कार अशा प्रकारे एकूण ७ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग-सासवड राजेंद्रसिंह गौर आणि पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत, पोलीस हवालदार दत्तात्रय काळे, पोलीस नाईक गोकुळ हिप्परकर, पोलीस कॉन्स्टेबल तुषार लोंढे, प्रविण शेंडे, मखरे, वसंत नरळे आणि संजय लगड यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत करीत आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे पुरंदर परिसरात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.























