उरुळी कांचनमध्ये कारची दुचाकीला जोरदार धडक; दोन गंभीर जखमी
एचपी पेट्रोल पंप चौकातील अपघात; कस्तुरी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांकडून जखमींना तातडीने मदत
उरुळी कांचन (ता. हवेली) : पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील एचपी पेट्रोल पंप चौकात (तुपे वस्ती रोड) रविवारी, दि. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार एका भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. गंभीर जखमी झालेले दोघे जण भाऊ-बहीण असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री नऊच्या सुमारास एचपी पेट्रोल पंप चौकातून दुचाकी जात असताना एका भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, यदुचाकीचा चक्काचूर झाली असून दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले आहे. तसेच यात कार चालक ही जखमी झाली असल्याची माहिती आहे. असे एकूण तीन जण जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे, कौस्तुभ मेमाणे, लखन ढवळे, संजय थापा यांच्यासह स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रसंगावधान राखत रुग्णवाहिका बोलावून जखमी पुरुष व महिलेला पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली.
दरम्यान, उरुळी कांचन परिसरातील वाढती वाहनांची वर्दळ आणि चौकांमधील अपघातांचा धोका लक्षात घेता वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतुकीचे नियम पाळावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
अपघातातील जखमींची प्रकृती आणि अपघाताचे नेमके कारण याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.























