शिवाजीनगर न्यायालयाबाहेरील गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी यवत पोलिसांच्या जाळ्यात!
कानगावच्या पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या मदतीने आरोपीला कडेठाण परिसरातून अटक; गावठी पिस्तुलाची लोखंडी मॅगझीन जप्त
✍️ नितीन करडे
यवत, (ता. दौंड) : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर भरदिवसा गोळीबार करून तसेच कोयत्याने जीवघेणा हल्ला करत दहशत माजविणाऱ्या फरार सराईत आरोपीला यवत पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. प्रथमेश दीपक येणपुरे (वय १९, रा. कात्रज, पुणे, मूळ गाव पाबे, ता. वेल्हा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून गावठी पिस्तुलासाठी वापरण्यात येणारी एक लोखंडी रिकामी मॅगझीन जप्त करण्यात आली आहे.
पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी आरोपीने गोळीबार करून कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न केला होता. या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा अन्वये भारतीय न्याय संहिता, आर्म अॅक्ट तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी प्रथमेश येणपुरे फरार झाला होता.
या गंभीर घटनेची दखल घेत आरोपीचा शोध सुरू असताना यवत पोलिसांना प्रथमेश येणपुरे हा यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कडेठाण गावाच्या परिसरात लपून बसल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने यवत पोलिसांचे पथक तातडीने कडेठाण येथे दाखल झाले. स्थानिक पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी शोधमोहीम राबवत फरार आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपीला यवत पोलीस ठाण्यात आणून अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तुलासाठी वापरण्यात येणारी एक लोखंडी रिकामी मॅगझीन आढळून आली. ती पोलिसांनी जप्त केली असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव धडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर कदम, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र फणसे तसेच पोलीस हवालदार संदीप देवकर, रॉकी देवकाते, पोलीस कर्मचारी प्रतीक जगताप, धीरज जाधव, दिनेश लोणकर, विनीत कुऱ्हाडे आणि पोलीस पाटील विठ्ठल बारवकर यांच्या पथकाने केली.
शिवाजीनगर न्यायालयाबाहेरील भरदिवसा घडलेल्या गोळीबाराच्या घटनेतील फरार आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या यवत पथकाने शोधून काढत जेरबंद केल्याने पोलीस दलाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
























