यंदाही वैष्णव भक्तांसाठी शिंदवणे घाट ठरणार का अवघड? कंटेनर अपघाताने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर हजारो वैष्णव भक्त पंढरीच्या दिशेने पायी वारी करत असताना शिंदवणे घाटातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (ता. ९ जुलै) गुरुवार रोजी सकाळी शिंदवणे घाटात कंटेनर ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे घाटातील धोकादायक परिस्थिती आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
शिंदवणे घाट हा काही ठिकाणी तीव्र चढ-उतार आणि धोकादायक वळणांसाठी ओळखला जातो. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. तीव्र उतार असल्याने घाट उतरताना वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवणे अनेकदा चालकांसाठी आव्हान ठरते. ब्रेक निकामी होणे, वाहनावरील नियंत्रण सुटणे किंवा घाटातील वळणांचा अंदाज न येणे यामुळे यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत.
“गेल्या काही वर्षांपूर्वी याच शिंदवणे घाटात याच ठिकाणी वारकऱ्यांचा ट्रक घाटाचा कठडा तोडून धोकादायक अवस्थेत लटकला होता. सुदैवाने त्यावेळी मोठी दुर्घटना टळली होती. मात्र, अशा घटनांमुळे घाटातील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.”
कंटेनर पलटी झाल्याची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पलटी झालेले वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा वाहतूक खोळंबा टळला. मात्र, केवळ अपघातानंतरची उपाययोजना न करता शिंदवणे घाटातील कायमस्वरूपी सुरक्षेच्या दृष्टीने ठोस नियोजन करण्याची गरज आहे. घाटातील धोकादायक वळणे, तीव्र उतार, आणि वाढती अवजड वाहतूक लक्षात घेता प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
दरवर्षी वारीच्या काळात बऱ्यापैकी वारकरी या घाटातून प्रवास करतात . त्यामुळे “यंदाही वैष्णव भक्तांसाठी शिंदवणे घाट अवघडच ठरणार का?” असा सवाल उपस्थित केला जात असून, प्रशासनाने वारीपूर्वीच सुरक्षेची काळजी घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा सासवड येथे मुक्कामास येतो त्यावेळी जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचन येथून यवतच्या दिशेने मार्गस्थ होतो यावेळी वैष्णव भक्त दोन्ही पालखींचे दर्शनासाठी शिंदवणे घाट येथून प्रवास करतात तसेच या शिंदवणे घाटातून वारकरी आळंदीला व पंढरपूर जाण्यास मार्गाने प्रवास करतात.























