कोरेगाव मूळ येथील दत्त मंदिरात चोरीचा प्रयत्न; दानपेटी फोडून पैसे मोजताना संशयित चोराला ग्रामस्थांनी पकडले!
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील बोधे काकडे वस्ती येथील दत्त मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयिताला ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडल्याची घटना बुधवारी (ता. २८ ऑक्टोबर) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी बोधे काकडे वस्ती येथील दत्त मंदिरात एक संशयित व्यक्ती दानपेटी फोडून त्यातील पैसे काढत होती. यावेळी मंदिराच्या दरवाजाची आतील कडी लावून तो पैसे मोजत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ मंदिराकडे धाव घेतली आणि संबंधित संशयिताला पकडले.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याच मंदिरातील दानपेटी फोडण्याचा ही दुसरी वेळ असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.























