गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा हातात घेणाऱ्यांना स्पष्ट इशारा
✍️ नितीन करडे
पुणे : यवत, (ता. दौंड) गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर परिसरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यवत पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील ३४ सराईत आरोपींवर हद्दपारीची कडक कारवाई करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाचा सण शांततेत आणि सुरळीत पार पडावा, नागरिकांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होऊ नये तसेच सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी यवत पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले होते. संबंधित व्यक्तींविरोधात यापूर्वी विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्यांच्या हालचालींमुळे परिसरातील सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार यवत पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत आरोपींविरोधात बीएनएसएस कलम १६३ (२) अन्वये विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण यांच्याकडे हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. या प्रस्तावांची चौकशी करण्यात आल्यानंतर संबंधित प्रस्तावांना मंजुरी प्राप्त झाली. त्यानंतर मंजूर आदेशांची अंमलबजावणी करत यवत पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील एकूण ३४ सराईत आरोपींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या हालचालींना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी गुंडगिरी करणे, अवैध धंदे चालविणे किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशाच प्रकारे कठोर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा यवत पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव धडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग बनकर तसेच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संदिप देवकर, महेंद्र चांदणे, रॉकी देवकाते, नवनाथ शेंडगे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल भुजबळ, प्रतिक जगताप, मारुती बाराते, सचिन गुंड, धिरज जाधव, दिनेश लोणकर आणि विनित कुऱ्हाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.























