पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू
✍️ नितीन करडे
केडगाव (ता. दौंड) : लातूरहून पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने केडगाव हद्दीत उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी (ता.१६ ऑगस्ट) रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात शेटीबा वडजी मुधोळकर (वय ७०) आणि देवानंद सुरेश मुधोळकर (वय १७, रा. मांजरा, जि. लातूर) यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, देवानंद याचा यापूर्वी येडशी येथे अपघात झाला होता. त्याच्यावर धाराशिव व लातूर येथे उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात येत होते. त्यावेळी सचिन मुधोळकर, त्यांची आई, आजोबा आणि जखमी देवानंद हे (एमएच २४ बी डब्ल्यू २६९३) क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून पुण्याकडे निघाले होते.
रुग्णवाहिका चालक ओंकार अंतराम कणसे हा मोबाईलवरील व्हिडिओ पाहत भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. प्रवाशांनी सावकाश वाहन चालविण्याची व मोबाईल न पाहण्याची सूचना करूनही त्याने वाहनाचा वेग कमी केला नाही. केडगाव येथील व्यंकटेश पेट्रोलियम पंपासमोरील सोलापूर-पुणे महामार्गावर रुग्णवाहिकेने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या (एम एच २३ ए यू १८१७) क्रमांकाच्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच यवत येथील श्री दत्त रुग्णवाहिकेचे चालक समीर अन्सारी, विष्णू राजपूत, इरफान पठाण व स्थानिक नागरिकांनी मदत करत अपघातग्रस्तांना पुढील उपचाराकरिता यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. इतर प्रवासी व रुग्णवाहिका चालकास किरकोळ दुखापत झाली.
या प्रकरणी सचिन सुरेश मुधोळकर यांच्या फिर्यादीवरून यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रुग्णवाहिका चालक ओंकार कणसे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.
























