उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन घरमालकांवर गुन्हे
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी (एटीएस) शाखेने परप्रांतीय व बांगलादेशी नागरिकांच्या पडताळणी मोहिमेअंतर्गत उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील कोरेगाव मूळ येथील कंचन वृंदावन सोसायटीमध्ये धडक तपासणी मोहीम राबवून भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन घरमालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
(ता. ५ ऑगस्ट) रोजी राबविण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक विजयमाला पवार व पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएसच्या पथकाने कंचन वृंदावन सोसायटी परिसरातील भाडेकरूंची पडताळणी केली. तपासणीदरम्यान काही घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती नियमानुसार संबंधित पोलीस स्टेशनमध्ये सादर केली नसल्याचे निदर्शनास आले. चौकशीत घरमालक अतुल आनंद कुलकर्णी (रा. मुक्ता रेसिडेन्सी, कोथरूड, पुणे) तसेच सुरेश कृष्णाजीराव नाझरे (रा. कंचन वृंदावन सोसायटी, कोरेगाव मूळ, ता. हवेली, जि. पुणे) यांनी जिल्हाधिकारी, पुणे यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले. भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये देणे बंधनकारक असतानाही त्यांनी ती न दिल्यामुळे दोघांविरुद्ध उरुळी कांचन पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
• एटीएसकडून कोरेगाव मूळ येथे पडताळणी मोहीम.
• भाडेकरूंची माहिती न दिल्याने दोन घरमालकांवर गुन्हे.
• BNS कलम २२३ अंतर्गत उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये कारवाई.
• सर्व घरमालकांना भाडेकरूंची माहिती वेळेत सादर करण्याचे पोलिसांचे आवाहन
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, नितीन जाधव तसेच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे गोपनीय अंमलदार विशाल रासकर आणि महिला पोलिस अंमलदार सावित्री सांगडे यांच्या सहभागाने पार पडली.
दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्व घरमालकांना महत्त्वाचे आवाहन करत आपल्या भाडेकरूंची संपूर्ण माहिती विहित नमुन्यात संबंधित पोलीस स्टेशनमध्ये वेळेत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या घरमालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलीसांनी दिला आहे.























