मिरवडी ग्रामपंचायतीत सायबर जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
क्विक हील फाउंडेशनच्या ‘सायबर शिक्षणातून सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये डिजिटल सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने क्विक हील फाउंडेशन यांच्या ‘सायबर शिक्षणातून सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन मिरवडी (ता. दौंड) ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे येथील विज्ञान शाखेच्या संगणकशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनी तथा सायबर स्वयंसेवक आकांक्षा क्षीरसागर आणि अंजली शेलार यांनी नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात मजबूत परवलीचा शब्द तयार करण्याचे महत्त्व, एकवेळ वापराचा संकेतांक (ओटीपी), वैयक्तिक ओळख क्रमांक (पिन), बँक कार्डवरील सुरक्षा क्रमांक (सीव्हीव्ही) यांसारखी गोपनीय माहिती कोणाशीही शेअर न करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच बनावट संकेतस्थळांच्या लिंक, संदेश व ई-मेलद्वारे होणारी फसवणूक कशी ओळखावी, समाजमाध्यमांचा सुरक्षित वापर, एकत्रित देयक प्रणाली (यूपीआय) आणि ऑनलाइन बँकिंग व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती देण्यात आली.
सायबर गुन्हा घडल्यास तातडीने १९३० राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन वर संपर्क साधावा तसेच राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असेही मार्गदर्शन करण्यात आले. वाढत्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद दुव्यावर क्लिक करू नये, अनोळखी व्यक्तींच्या फोन किंवा संदेशांवर विश्वास ठेवू नये आणि आर्थिक व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. या जनजागृती उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली असून उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सागर शेलार, चेअरमन रजिस शेख, भाऊ थोरात, अभिजित धायगुडे, अक्षय टकले, प्रशांत कांबळे, दीपक काळे तसेच शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























