दगडफेक, कोयता आणि दहशत; चंदननगर पोलिसांनी टोळीला काही तासातच चढवल्या बेड्या
✍️ नितीन करडे
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहती परिसरात हातात धारदार हत्यारे घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा चंदननगर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली असून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी कोयता आणि दोन मोटारसायकलींसह एकूण १ लाख २० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास तीन मोटारसायकलींवरून आलेल्या सहा ते सात जणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये प्रवेश करून हातातील धारदार हत्यारे हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. तसेच परिसरातील नागरिकांच्या घरांवर दगडफेक करून भीतीचे वातावरण निर्माण केले.
या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात २६ जून २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम, शस्त्र अधिनियम कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ अन्वये तसेच आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू करत चंदननगर पोलिसांच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत अवघ्या सहा तासांत कारवाई केली. या कारवाईत राहुल भास्कर वाणी (वय १८, रा. खांदवेनगर, वाघोली), अनिकेत देविदास वैरागर (वय २०, गणेशनगर, वडगावशेरी), राहुल सुनिल धुरंधर (वय २०, राजश्री कॉलनी, वडगावशेरी) आणि प्रेम गणपती गरड (वय १८, गणेशनगर, वडगावशेरी) यांना २७ जून रोजी पहाटे १.१५ वाजता अटक करण्यात आली. तसेच या गुन्ह्यातील एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला एक लोखंडी कोयता आणि दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख २० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण नरवडे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, सहाय्यक पोलीस आयुक्त नुतन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक किरण नरवडे तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.























