सासवड पोलिसांची मोठी कारवाई; 12 लाख 94 हजाराचा गुटखा जप्त
✍️ नितीन करडे
पुणे : सासवड पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखू असा एकूण १२ लाख ९४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दि. ४ जून २०२६ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास नारायणपूर, ता. पुरंदर येथील कोडीत रोडवर करण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे हे रात्रगस्त करत असताना पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, राखाडी रंगाच्या वॅगनार कारमधून प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूची वाहतूक होणार आहे. माहितीच्या आधारे पोलीस पथकाने नारायणपूर येथील कोडीत रोडवर सापळा रचला. यावेळी (एम एच-११-डीझेड-१९५४ ) क्रमांकाची राखाडी रंगाची वॅगनार कार आल्याचे दिसून आले. पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यामध्ये ‘केसरयुक्त विमल पान मसाला’, ‘V-1 Tobacco’, ‘व्ही-१ सुगंधी तंबाखू’ तसेच इतर प्रतिबंधित पदार्थ आढळून आले.
पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त करून सासवड पोलीस ठाण्यात आणला. याप्रकरणी पोलीस शिपाई तेजस विलास शिवतरे यांच्या फिर्यादीवरून जिनेश्वर कुबेर कल्याणी (वय १८) व अजित राजाराम आबदान, दोघेही रा. रूई, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींविरुद्ध कलम अन्न सुरक्षा व मानके अधिनियम संबंधित विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे करीत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक बारामती गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या नेतृत्वाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, पो हवा अविनाश होळकर , विशाल जाधव, पो शि म्हेत्रे नवनाथ नानवर, तुषार लोंढे, प्रणय मखरे, सचिन किवळे, अक्षय चिले, प्रविण शेंडे यांच्या पथकाने केली आहे.
























