कदमवाकवस्तीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त; ११ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ ची धडक कारवाई; एफडीए अधिकाऱ्यांच्या मदतीने छापा!
✍️ नितीन करडे
लोणी काळभोर : पुणे शहरातील अवैध धंद्यांविरोधात पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले असताना, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार करणाऱ्या अवैध कारखान्यावर धडक कारवाई केली आहे. कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेला हा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून, या कारवाईत तब्बल ११ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील अवैध व्यवसाय तसेच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुणे पोलीस दलातील सर्व घटकांना दिले आहेत. त्यानुसार दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ मधील अधिकारी व अंमलदार २१ नोव्हेंबर २०२६ रोजी पूर्व प्रादेशिक विभागात गस्त घालत होते.
यावेळी पोलीस हवालदार परेश सावंत आणि पोलीस अंमलदार सचिन कांबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत कदमवाकवस्ती परिसरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार करण्याचा अवैध कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली. इन्वोरा इंग्लिश स्कूलसमोर, गायकवाड वस्ती, कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये हा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांच्या मदतीने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला.
या छाप्यादरम्यान रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता (वय २६, रा. काळुबाई मंदिराजवळ, थेऊर फाटा, वृंदावन कार्यालय रोड, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे) हा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार करताना रंगेहात आढळून आला. पोलिसांनी कारखान्यातील तयार माल, कच्चा माल, पॅकिंग साहित्य, पॅकिंग मशीन तसेच मालाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी चारचाकी गाडी असा एकूण ११ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाला, सुगंधित किंवा स्वादिष्ट सुपारी आणि तत्सम पदार्थांचे उत्पादन, साठा, वितरण व विक्री यावर बंदी आहे. अशा पदार्थांच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन कर्करोगासारख्या दुर्धर आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणी आरोपी रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरोधात लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पो उपनि संतोष तानावडे, सहा फौज ज्योतिबा कुरळे, पो हवा परेश सावंत, महेश बारवकर, पोलीस अंमलदार प्रफुल्ल मोरे आणि सचिन कांबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
पुणे शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
























