पुढील २५ वर्षांच्या विजेच्या गरजांचे नियोजन करा; हवेलीसाठी स्वतंत्र वीज वितरण विभागाची आमदार माऊली आबा कटके यांची मागणी!
हवेलीच्या झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या मुख्य अभियंत्यांची भेट; नवीन सबस्टेशन, EHV उपकेंद्रे आणि फीडर्स उभारण्यावर भर
✍️ नितीन करडे
पुणे : हवेली तालुक्यात झपाट्याने वाढणारे नागरीकरण, औद्योगिक क्षेत्राचा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि गृहप्रकल्पांची संख्या लक्षात घेता भविष्यातील विजेची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. केवळ आजच्या विजेच्या गरजांचा विचार न करता पुढील २५ वर्षांचे नियोजन करून मुळशी वीज वितरण विभागाचे विभाजन करावे आणि हवेलीसाठी स्वतंत्र ‘हवेली वीज वितरण विभाग’ निर्माण करावा, अशी ठाम मागणी शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांनी केली आहे.
यासंदर्भात आमदार कटके यांनी महावितरण पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता पंकज तगलपल्लेवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. हवेली तालुक्यासाठी स्वतंत्र वीज वितरण विभाग निर्माण करण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करून पुढील मंजुरीसाठी महावितरणच्या मुख्य कार्यालय, प्रकाशगड (मुंबई) येथे पाठविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
नवीन सबस्टेशन आणि EHV उपकेंद्रांच्या उभारणीवर भर!
हवेली तालुक्यातील वाढती विजेची मागणी लक्षात घेऊन आमदार कटके यांनी विविध पायाभूत सुविधांच्या कामांचा मुद्दा उपस्थित केला. यामध्ये लोणी काळभोर येथील EHV उपकेंद्राचे काम पूर्ण करणे, वाघोली परिसरातील प्रस्तावित दोन EHV उपकेंद्रांची उभारणी करणे, शिंदवणे सबस्टेशन कार्यान्वित करणे, पेरणे सबस्टेशनचे काम पूर्ण करणे, तसेच नवीन कोरेगाव (कोरेगाव मूळ) आणि उरुळी कांचन येथे नवीन सबस्टेशन व फीडर्स उभारण्याची मागणी करण्यात आली.
सौर ऊर्जा योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा!
शासनाच्या विविध सौर ऊर्जा योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांसह गृहनिर्माण संस्थांना मिळावा, प्रलंबित वीज जोडण्या तातडीने मंजूर कराव्यात आणि नागरिकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्याही यावेळी आमदार कटके यांनी केल्या.
पुढील २५ वर्षांचा विचार करूनच विकासाचे नियोजन!
यावेळी आमदार माऊली आबा कटके म्हणाले की, “हवेली तालुक्याचा झपाट्याने विस्तार होत असून आगामी काळात लोकसंख्या, औद्योगिक क्षेत्र आणि गृहप्रकल्पांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे केवळ आजच्या विजेच्या गरजांचा विचार करून चालणार नाही, तर पुढील २५ वर्षांचे नियोजन करणे आवश्यक आहे. नागरिकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, तसेच भविष्यात पायाभूत सुविधांचा अभाव निर्माण होऊ नये, यासाठी स्वतंत्र हवेली वीज वितरण विभागाची मागणी केली आहे.”
हवेली तालुक्याच्या वाढत्या विकासाला पुरेशी वीज वितरण यंत्रणा उपलब्ध व्हावी, ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार वीजपुरवठा मिळावा आणि भविष्यातील विजेची समस्या टाळता यावी, या दृष्टीने स्वतंत्र वीज वितरण विभागाची मागणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे























