पांगारे खून प्रकरणाचा सासवड पोलिसांकडून अवघ्या ७ तासांत छडा; आरोपी जेरबंद!
सासवड पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाची दमदार कामगिरी; सीसीटीव्ही, तांत्रिक माहिती आणि गोपनीय तपासाच्या आधारे आरोपीचा डोंगराळ भागात शोध
✍️ नितीन करडे
सासवड : पांगारे (ता. पुरंदर) : पुरंदर तालुक्यातील मौजे पांगारे येथे १९ नोव्हेंबर २०२६ रोजी घडलेल्या खूनाच्या गंभीर घटनेचा सासवड पोलिसांनी अवघ्या सात तासांत छडा लावला आहे. घटनास्थळावरून चारचाकी वाहनाने पलायन केलेल्या आरोपीचा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे माग काढत सातारा जिल्ह्यातील शिरवळ परिसरातील डोंगराळ भागातून शोध घेत आरोपीला बेड्या ठोकल्या. शशिकांत माणिकराव काकडे (रा. बिबवेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे सासवड पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पांगारे येथे घडलेल्या खून प्रकरणी सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी गुन्हेशोध पथकाला तातडीने तपास करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. तपासात आरोपीने गुन्हा केल्यानंतर चारचाकी वाहनातून घटनास्थळावरून पलायन केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली.
दरम्यान, आरोपीने आपले वाहन सातारा जिल्ह्यातील शिरवळ परिसरात सोडून तेथून डोंगराळ भागातून पळ काढल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर सासवड पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने डोंगराळ परिसरात शोधमोहीम हाती घेतली. पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास आणि पाठपुराव्याच्या जोरावर आरोपीचा ठावठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेतले. आरोपी शशिकांत माणिकराव काकडे याच्याकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या सात तासांच्या आत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल, अपर पोलीस अधिक्षक शुभम कुमार, अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी (भोर विभाग) राजेंद्रसिंह गौर, सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक शंकर राऊत, वैभव सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक युवरज धोंडे, सहा. फौजदार तोडकर, सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दत्तात्रय काळे, गणेश सोनवणे, विशाल जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार महेश खरात, अक्षय यादव, संतोष भापकर, अमोल शेडगे, सासवड पोलीस स्टे पो कॉन्स्टे तुषार लोंढे, प्रविण शेंडे, अक्षय चिले, किरण तुपे, चेतन पाटील, भरत मोहोळ यांचे पथकाने केली आहे.
सदर खून प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे करीत आहेत. अवघ्या सात तासांत आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याची कामगिरी सासवड पोलिसांनी केल्याने गुन्हेशोध पथकाच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.























