पैशांच्या वादातून पांगारे येथे महिलेचा निर्घृण खून; डोक्यात लोखंडी रॉड व वीट मारून हत्या केल्याचा आरोप; सासवड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल; दिरासह सासूवर फिर्यादीचा आरोप
✍️ नितीन करडे
सासवड : पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे पैशांच्या वादातून एका ४७ वर्षीय महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १९ नोव्हेंबर) सकाळी ८.४० वाजण्याच्या सुमारास घडली. उज्वला रामदास काकडे (वय ४७, रा. पांगारे, ता. पुरंदर, जि. पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी महिलेचा दीर शशिकांत माणिकराव काकडे आणि सासू सुलोचना माणिकराव काकडे (दोघे रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी, पुणे) यांच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत महिलेचा भाऊ गणेश दत्तात्रय मेमाणे (वय ३९, रा. श्रीलक्ष्मी एन्क्लेव्ह सोसायटी, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत उज्वला काकडे यांच्याकडे त्यांचे दीर शशिकांत काकडे यांनी त्यांचे दाजी रामदास माणिकराव काकडे यांच्याशी संबंधित घेतलेले पैसे, चेक, सोन्याचे दागिने तसेच इतर कागदपत्रे परत मागितल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून शशिकांत काकडे याने उज्वला यांच्या डोक्यात लोखंडी रॉड व वीट मारून त्यांना गंभीर जखमी केले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच या घटनेत सासू सुलोचना काकडे यांनी शशिकांत याला पाठबळ दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पांगारे परिसरात खळबळ उडाली असून, पैशांच्या आणि आर्थिक व्यवहारांच्या वादातून महिलेचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे करीत आहेत.























