फुरसुंगीमध्ये ताडी बनविणाऱ्या प्लॉटवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; ५ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त
✍️ नितीन करडे
पुणे : फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ताडी तयार करून तिची विक्री करणाऱ्या ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ५ लाख ३३ हजार ८६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १३ ऑगस्ट २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडून फुरसुंगी परिसरात अंमली पदार्थ विरोधी पेट्रोलिंग व कारवाई सुरू होती. यावेळी सर्व्हे क्रमांक २१५, महात्मा फुले वसाहत, फुरसुंगी, पुणे येथे भिमराव यंकाप्पा भंडारी यांच्या इमारतीच्या टेरेसवर ताडी हे मादक द्रव्य तयार करून त्याची विक्री केली जात असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली.
मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत भिमराव यंकाप्पा भंडारी (वय ७८, रा. गंगानगर, महात्मा फुले वसाहत, फुरसुंगी, पुणे; मूळ रा. वडगिरी, ता. शहापूर, जि. यादगिर, कर्नाटक) तसेच दिगंबर रामलिंग जंगम (वय २३, रा. गंगानगर, महात्मा फुले वसाहत, फुरसुंगी, पुणे; मूळ रा. शालू गल्ली, हिरवा मारुती चौक, ता. भूम, जि. धाराशिव) यांच्याकडून ५,३३,८६० रुपये किमतीचा मालमुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त, गुन्हे गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-३ शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण तसेच पोलीस हवालदार योगेश कुंभार, सुमित यादव, प्रशांत कळसकर, शरद धांडे, सतीश चव्हाण, संदिप देवकाते, विनोद निंभोरे, सुरेखा साबळे, सुकेशिनी आंबले, आरती दिवेकर, तसेच पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे, देवीदास वांढरे आणि अमोल गायकवाड यांनी सहभाग घेतला.
फुरसुंगी परिसरात अवैधपणे मादक पदार्थ तयार करून त्याची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.























