कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त
अंमली पदार्थ विरोधी पथक-२ व अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई; दोघांकडून बनावट मावा ताब्यात
✍️ नितीन करडे
पुणे : कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्रीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी मोठी कारवाई करत १ लाख ४९ हजार ५०० रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा बनावट मावा जप्त केला. ही कारवाई ९ ऑगस्ट २०२६ रोजी काकडे वस्ती येथील करणी पार्किंग परिसरात करण्यात आली.
अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात कारवाई करण्याच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण व सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक यांच्यासह पथक कोंढवा परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी काकडे वस्ती येथील करणी पार्किंगमध्ये नैनिताल ट्रॅव्हल्सची बस क्रमांक ए.आर.-११/ई-२००१ या बसमध्ये बनावट मावा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संबंधित बसची तपासणी केली असता १,४९,५०० रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा मिठा मावा आढळून आला. पोलिसांनी हा मावा ताब्यात घेत कारवाई केली.
या प्रकरणात बस चालक इंदरसिंग लाडूसिंग (वय ४२, रा. ग्राम रामपुरा, तहसील रायपूर, जि. पाली, राजस्थान) तसेच वाहन मालकाचा मुलगा नरेश दिनेश नेनिवाल (वय २३, रा. इंद्र कॉलनी, गाव बिलारा, तहसील बिलारा, जि. जोधपूर, राजस्थान) यांच्याकडून हा मावा ताब्यात घेण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथक-२ गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेच अन्न व औषध प्रशासन, पुणे यांच्या अधिकाऱ्यांचा सहभाग होता. अन्न व औषध प्रशासनाकडून सहा. आयुक्त (अन्न) खोसे, महिला सोनकांबळे, प्रतिक जाधव व अन्न सुरक्षा अधिकारी स्नेहल येणारे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
या कारवाईत पोलीस हवालदार योगेश कुंभार, सतीश चव्हाण, प्रशांत कळसकर, सुमित यादव, पृथ्वीराज पांडुळे, संदिप देवकाते, महिला पोलीस हवालदार सुरेखा साबळे, सुकेशनी आंबले, आरती दिवेकर तसेच पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे, अमोल गायकवाड, देविदास वांढरे व अमोल मुंढे यांनी सहभाग घेतला.
बनावट माव्याचा वापर नेमका कुठे आणि कोणत्या उद्देशाने होणार होता, याबाबत पुढील तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या माव्याची अन्न व औषध प्रशासनाकडून आवश्यक तपासणी करण्यात येत आहे.























