धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान
उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे शिक्षणासाठी क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करत अज्ञात व्यक्तीकडून मोटारसायकलींची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उरुळी कांचन येथील रेल्वे स्टेशन परिसरात गुरुवारी (ता. २ एप्रिल) सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, क्लाससाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी उन्हाच्या कडाक्यामुळे आपापल्या मोटारसायकली झाडाखाली लावल्या होत्या. मात्र, भर दिवसा अज्ञात व्यक्तीने संधी साधत तब्बल आठ ते दहा मोटारसायकलींच्या सीटवर ब्लेड मारून त्या फाडल्या. या प्रकारामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता वाढली असून परिसरात सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
“मुलांना लांबून क्लासला यावे लागते, त्यामुळे ते वाहन घेऊन येतात. पण अशा प्रकारे वाहनांची तोडफोड होणे अत्यंत धक्कादायक आहे,” असे समीर कोतवाल यांनी सांगितले.
[“विद्यार्थ्यांच्या वाहनांचे नुकसान करणे हा गंभीर गुन्हा आहे. हे कृत्य करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई झाली पाहिजे,”]
-अजिंक्य कांचन,संचालक, अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन
[“ज्याने कोणी विद्यार्थ्यांच्या वाहनांचे नुकसान केले आहे, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. झालेल्या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल.”]
— सचिन वांगडे, पोलीस निरीक्षक, उरुळी कांचन पोलीस स्टेशन
























