उरुळी कांचन येथे कबूतर चोरी; १६९ कबूतरांसह सुमारे सात लाखांचा ऐवज लंपास
✍️नितीन करडे
उरुळी कांचन (ता. हवेली) : येथील शिंदवणे रोड परिसरात बुधवार दि. २५ फेब्रुवारी रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी तब्बल १६९ कबूतरांची चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरीस गेलेल्या कबूतरांची किंमत अंदाजे सात लाख रुपये इतकी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदवणे रोडवरील दोन शेजारी असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यांवर एका इमारतीच्या टेरेस वर अजय गाढवे यांची १०९ कबुतरे (५ लाख ५० हजार रुपये किंमतीचे) तर अमीर शेख यांची ६० कबुतरे (१ लाख ५० हजार रुपये) असा एकुण ७ लाख रुपयचा, विशेष पद्धतीने पाळण्यात येणारी कबूतरं ठेवण्यात आली होती. ही कबूतरं विविध दुर्मिळ व स्पर्धात्मक जातींची असल्याने त्यांना मोठी बाजारपेठीय किंमत असल्याचे अजय गाढवे यांनी सांगितले. संबंधित कबूतरपालकाने नेहमीप्रमाणे रात्री व्यवस्था पाहून घेतली होती; मात्र सकाळी पाहणी केली असता पिंजऱ्यांचे कुलूप तोडलेले आढळले आणि सर्व कबूतरं गायब असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कबूतर पालन हा काहींसाठी छंद असला तरी अनेक जण त्याकडे व्यवसाय म्हणून पाहतात. स्पर्धात्मक व प्रजाती सुधारित कबूतरांची किंमत हजारोंपासून लाखोंपर्यंत असते. त्यामुळे ही चोरी पूर्वनियोजित असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. यात कबूतरपालकांला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
























